असं म्हणतात की, ‘मुलं देवाघरची फुलं’ असतात, पण विचार आणि वास्तविकते मधे बराच फरक आढळून येतो. कुठल्याही सजीव पदार्थाला विकसीत करण्यासाठी वातावरण खूप महत्वाची भूमिका पार पाडत असते, विशेषतः मुलांसाठी. मुलांच्या सुरुवातीचा काळातील विकासा साठी शाळेतील आणि घरातील वातावरण खूप महत्वाचे असते. ह्या वातावरणामधे मुलांना त्यांचा अद्वितीयपणा ओळखण्यासाठी मदत करणारे घटक असले पाहिजे. साधारणतः संभाषण (मुलांसोबत केले जाणारे), विविध गुणांचा विकास इत्यादी गोष्टी ह्या आपण एकसंघ पद्धतीने वापरतो. आजवर चालत आलेले प्रमाण खरे मानून त्या अनुरूप मुलांना घडविण्याचा प्रयत्न करतो. आणि हा केलेला प्रयत्नच त्यांच्या नैसर्गिक विकासाच्या आडवा येतो.
पालक आणि शिक्षक ह्या दोन्ही घटकांनी मुलांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून उपयुक्त अशा वातावरण निर्मिती वर भर दिला पाहिजे. प्रत्येक मूळ/व्यक्ती हा ‘अद्वितीय’ आहे ह्या वैज्ञानिक सत्याला आपण नाकारू शकत नाही. नको त्या स्वप्नांना बळी पडुन हया अद्वितीयपणाचा बळी घेण्याचा अधिकार आपला नाही. एक सुयोग्य/सुसंवादी समाज घडवायचा असेल तर मुलांच्या मनात स्पर्धात्मक जीवना ऐवजी, एकमेकाच्या अद्वितीयेतेचा आदर जागृत कसा होईल हयावर भर दिला पाहिजे. गुलाबाच्या फुलाला गुलाबाचा फुल म्हणूनच विकसित केलं पाहिजे तरच ही परमेश्वराची बाग विविधतेत सुंदर घडेल.
फक्त ‘मुलं देवाघरची फुलं’ म्हणुन चालणार नाही, ह्या फुलांना त्यांच्या नैसर्गिकते मधे फुलु द्या. स्वप्नांच्या ओझ्यापेक्षा जागृतिचं वरदान ह्यांना प्राप्त करून दया. फक्त संस्कारांपेक्षा विज्ञानाचीही साथ लाभु दया.